स्त्री-पुरुष समता ही संकल्पना आता
अगदीच अनोळखी राहिलेली नाही. मात्र ती वास्तवात आणण्यासाठी कोणते मार्ग अवलंबता
येतील? ती काही कोणती क्रांतीसदृष्य घटना असेल काय? याचा विचार करायला
हवा. माझ्यामते लहान मुल हळू-हळू मोठे होत जाते आणि कधीतरी तरुण होते, नक्की ते कधी तरुण
होते हे कुणीच सांगू शकत नाही;
ती एक प्रक्रिया असते. त्याप्रमाणेच
स्त्री-पुरुष समता ही कोणतीही घटना नसेल तर ती एक प्रक्रियाच आहे. सध्या
स्त्री-पुरुष समता नाही हे वास्तव आहे. मात्र आपण त्या दिशेने चाललेलो आहोत हे
नक्की.
आपल्या सर्वांनाच स्त्रीवादी
असल्याकारणाने असेल किंवा एकूणच समाज अधिक निकोप, सुदृढ व्हावा ही प्रबळ इच्छा असल्याने
ही प्रक्रिया अधिक वेगाने व्हावी असे वाटत असते. जर असे व्हावे असे आपल्याला वाटत
असेल तर काही कृतीकार्यक्रम आपण हाती घेणे आवश्यक आहे. हा काही नवीन कार्यक्रम
असेल असे नव्हे. अनेक स्त्रीवादी संघटना, कार्यकर्ते यावर विचार, चिंतन आणि कृती
करतच आलेले आहेत. आपण त्याला व्यापक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्त्री-पुरुष समता आणायची असल्यास मला
वाटते की, दोन महत्वाचे कृतीकार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. हे दोन्ही
कार्यक्रम वैयक्तिक पातळीवरचे आहेत. त्यामुळे अमलात आणणे कोणत्याही सामान्य
व्यक्तीला शक्य आहे, त्यामुळेच यांना व्यापक स्वरूप देता येऊ शकते.
त्यापैकी पहिला आहे, स्वतःचे नाव
लावताना, सांगताना वडिलांच्या नावासोबतच आईचेही नाव लावावे. उदाहरणार्थ माझे
नाव होईल मयूर अरुणा जयवंत खराडे. (आडनाव लावावे की नाही हा येथे चर्चेचा विषय
नाही.) आता मुद्दा असा की, असे नाव आज काही लोक लावत आहेत. त्याबरोबर आपणही लावल्याने काही
फरक पडेल काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी या कृतीमागचे तत्वज्ञान समजून घ्यावे
लागेल.
स्त्री-पुरुषांच्या सामाजिक संबंधांना
एक मोठा इतिहास आहे. प्राचीन काळी मातृसत्ताक किंवा मातृप्रधान समाजव्यवस्था
अस्तित्वात होती. ही व्यवस्था जगभरातील जवळपास सर्वच मानवसमुहांमध्ये अस्तित्वात
होती. त्यानंतर ऐतिहासिक वाटचालीत ही मातृसत्ता जाऊन पितृसत्ता किंवा पुरुषप्रधान
समाजव्यवस्था अस्तित्वात आली. या प्रक्रियेतील एक महत्वाचा भाग होता तो म्हणजे, वारसा हक्क
स्त्रीच्या नावाने न लावता तो पुरुषाच्या नावाने लावणे. या प्रक्रियेबाबत फ्रेडरिक
एंगल्स या विचारवंताचे मत पाहणे गरजेचे वाटते. एंगल्स त्याच्या “कुटुंबसंस्था, खाजगी मालमत्ता आणि
शासनसंस्था यांचा उगम”(मराठी अनुुवाद) या प्रसिध्द ग्रंथात लिहितो की, “अशा प्रकारे, एका बाजूला, संपत्तीत ज्या
प्रमाणात वाढ होत गेली त्या प्रमाणात कुटुंबातील पुरुषाचे स्थान हे स्त्रीच्या
स्थानापेक्षा महत्वाचे होऊ लागले आणि दुसऱ्या बाजूला आतापर्यंत पिढ्यानपिढ्या चालू
असलेला वारसा-हक्काचा क्रम उलथून टाकून त्या जागी स्वतःच्या मुलांना वारसा
देण्यासाठी ह्या वाढलेल्या स्थानाचा उपयोग करून घेण्यास चालना मिळाली. तथापि
जोपर्यंत वंशज हा मातेकडून ओळखला जात होता, तोपर्यंत अशा रीतीने वारसाक्रम बदलणे
केवळ अशक्यच होते. त्यामुळे मातृहक्क उलथून टाकणे भाग होते आणि तसा तो उलथून
टाकलाही. हे करणे, आज आपल्याला भासते तितके काही कठीण काम नव्हते; कारण या
क्रांतीसाठी – मानवजातीने अनुभवलेली सर्वात निर्णायक अशी क्रांती—गणांतील कोणत्याही
हयात सभासदांपैकी एकालासुद्धा कोणताही धक्का देण्याची जरुरी नव्हती! सर्व सभासद
जसे होते तसेच राहू शकले . येथून पुढे पुरुषांची मुले ही गणातच राहतील व स्त्रीची
सर्व मुले गणातून बाजूला काढून ती त्या मुलांच्या बापाच्या गणात दाखल केली जातील.
अशा एका साध्या निर्णयाने हे काम भागले! त्यामुळे स्त्री वंशामार्फत वंशावळ
मानण्याची प्रथा आणि मातृप्रधान वारसा कायदा हे फेकले जाऊन त्या जागी पुरुष
वंशामार्फत वंशावळ आणि पितृप्रधान वारसा कायदा हे अस्तित्वात आले.” (पा. क्र. 36, 37) ‘मानवजातीने अनुभवलेली सर्वात निर्णायक क्रांती’ हे त्याचे शब्द
अतिशय महत्वाचे आहेत. असेच आणखीन एक मत पाहूया. हे मत आहे सिमोन-द-बोव्हूआर या
लेखिकेचे. ती तिच्या “द सेकंड सेक्स”
या पुस्तकात लिहिते, “कुटुंबातील किंवा
टोळीतील वारसा मातृकुळावर आधारित न राहता तो पितृकेंद्री होणे ही प्राचीन काळातील
सर्वात मोठी वैचारिक क्रांती होती. या क्रांतीनंतर आईचा केवळ पोषणकर्ती असा अपकर्ष
झाला.”(पा.क्र. 147) सिमोन सुद्धा या प्रक्रियेला सर्वात मोठी वैचारिक क्रांती मानते.
पुढे ती या प्रक्रियेची परिणिती सांगताना म्हणते, “माणसाला स्वतःची अस्मिता शाबूत
ठेवण्यासाठी स्वतःच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क हवा असतो. व हा हक्क भविष्यातही कायम
राहण्यासाठी वारसदारांवर सुद्धा पूर्ण सत्ता हवी असते. त्यामुळेच मुलांचा हक्क
स्त्रीकडे जाऊ नये यासाठी पुरुषाने आटोकाट प्रयत्न केला. याचीच दुसरी बाजू म्हणजे
स्त्रीला आपल्या टोळीकडून वारसाहक्काने मालमत्ता मिळण्याचाही हक्क राहिला नाही. विवाहमध्ये
स्त्री एका टोळीपासून पूर्णपणे तोडली जाऊन नवऱ्याच्या टोळीमध्ये आणून टाकली जाऊ
लागली. गुलामाला किंवा गुराढोराला विकत घ्यावे त्याप्रमाणे पुरुष बायकोला विकत घेऊ
लागला. तिला पुरुषाच्या घरचे नियम लागू होऊ लागले. तिला झालेली अपत्ये पुरुषाच्या
मालकीची समजली जाऊ लागली. पण वडिलांचा वारसा हा फक्त मूलग्याकडे जाऊ लागला. मुलगी
जर वडिलांची वारसा झाली तर विवाहानंतर ती वडिलांच्या संपत्तीतला काही हिस्सा
नवऱ्याच्या घरी नेणार! हे टाळावे म्हणून तिला वारसाहक्कातून पूर्णपणे वगळूनच
टाकण्यात आले. पर्यायाने वडीलांच्याही संपत्तीत हिस्सा नाही आणि नवऱ्याच्याही
मालमत्तेवर अधिकार नाही अशी स्त्रीची दैना झाली. तिचा कशावरच मालकी हक्क न
राहिल्याने अगदी स्वतःवरसुद्धा अधिकार राहिला नाही. लग्नाआधी तिचे वडील तिच्यावर
हक्क सांगू लागले आणि लग्नानंतर तिचा नवरा! या रितिरिवाजानुसार नको असलेल्या
अर्भकांना मारून टाकण्याचा हक्क वडिलांना मिळाला. अर्थात मूलग्यांना मारून
टाकण्याचे प्रकार अगदी क्वचित घडत. पण मुलींना मारून टाकण्याची प्रथा अनेक जमातीत
सर्रास सुरू झाली. विसाव्या शतकातही ती नष्ट झालेली नाही.”(पा. क्र. 149)
स्त्रियांचा सामाजिक दर्जा घसरण्यात या सर्व प्रक्रियेचा केवढा
मोठा वाटा होता हे आपण पाहिले. वर्तमानातील स्त्रीभ्रूणहत्या (रूढ शब्द), स्त्रियांवरील
अत्याचार, पुरुष स्त्रीवर गाजवत असलेले अधिकार यांच्या मुळाशी कोठेतरी या
प्रक्रियेचा संबंध असलाच पाहिजे असे मला वाटते. म्हणून वर्तमानातील समस्या
सोडविण्यासाठी हा प्रक्रियेचा आधार घेऊन स्वतःचे नाव लावताना आईचे नाव लावणे आणि
मुलीसुद्धा वंश चालवू शकतात हे दाखवून देणे गरजेचे आहे. एंगेल्सनेच मार्क्सचे एक
वाक्य उद्धृत केलेले आहे. “माणसाची डोकेबाज हुषारी! नुसती नावे बदलून वस्तूमध्ये बदल करायचा!
जेव्हा अगदी उघड हितसंबंधांनी उचल खाल्ली असेल तेव्हा परंपरेतच परंपरा मोडण्यासाठी
पळवाटा शोधून काढायच्या!”(पूर्वोत्त पा. क्र. 37)
मला वाटत ही पळवाट शोधून वापरावी
लागेल. माझा आग्रह फक्त नावाच्या बाबतीत नाही. संपत्तीच्या बाबतीत देखील आहे.
संपत्तीच्या वारशाबाबतीत चांगले कायदे झालेले आहेतच. पण वैयक्तिक आयुष्यात पहिली
पायरी म्हणून नावानेच सुरुवात करावी लागेल.
दुसरा कार्य-क्रम हा प्रामुख्याने
पुरुषांसाठी आहे. कारण प्रत्येक विषमतावादी व्यवस्था ही कुणाला ना कुणाला तरी
झुकते माप देत असते. काही विशिष्ट लोकांचे हितसंबंध ती व्यवस्था जपत असते.
पुरुषप्रधान समाजव्यवस्था ही पुरुषांचे हितसंबंध जपत असते. त्यांना विशेष हक्क
अधिकार देत असते. आपण सवर्णांच्यावर टीका करतो, की त्यांनी इतरांचे शोषण केले. म्हणजे
काय? त्यांनी व्यवस्थेने दिलेले विशेषाधिकार नाकारले नाहीत ते तसेच
वर्षानुवर्षे चालू ठेवले. माझ्यामते हे विशेषाधिकार नाकारणे म्हणजेच व्यवस्था
नाकारणे. म्हणून स्वतःची कामे स्वतः करणे -विशेषतः पुरुषांनी- स्वतःचे कपडे धुणे, स्वतःची भांडी
घासणे, स्वतःचा जेवणातील कामाचा वाटा उचलणे इत्यादी, हा स्त्रीपुरुष
समता आणण्याचा एक मार्ग ठरू शकेल. खरेतर स्वतःची कामे स्वतः न करणारा पुरुष
स्त्रीवादी ठरू शकणार नाही. वास्तवात तशी कृती स्वतःचे काम स्वतः करून केली
पाहिजे. मला माहिती आहे वर्षानुवर्षांच्या सवयी एका दिवसात बदलणे शक्य नाही. एका
दिवसात स्वयंपाक शिकणे किंवा इतर बाबी शिकणे शक्य नाही मात्र याची सुरुवात मात्र
करायलाच हवी. किमान स्वतःला स्त्रीवादी म्हणवणाऱ्या किंवा होऊ इच्छिणाऱ्या सर्व
पुरुषांनी..
या लेखात मी दोन कृतिकार्यक्रम सुचवले आहेत. हे अंतिम आहेत यांनीच
स्त्रीपुरुष समता येईल असा माझा दावा नाही. यापूर्वीही बऱ्याच लोकांनी
कृतिकार्यक्रम दिले आहेत त्याचे महत्वही मी नाकारत नाही. हे कृतिकार्यक्रम नवीन
आहेत असाही माझा दावा नाही. परंतु एक मात्र नक्की मला वाटते, ते म्हणजे हे दोन
कृतिकार्यक्रम जर आपण प्रभावीपणे राबवले तर आपण स्त्रीपुरुष समता आणण्यात जास्त
वेगवान होऊ. या कार्यक्रमांचे महत्व सांगताना -विशेषतः आर्थिक सुधारणांच्या
सापेक्ष- मी सीमोनचेच आणखीन एक वाक्य देऊ इच्छितो.
“जोपर्यंत आर्थिक स्वावलंबनाबरोबरच आवश्यक ते नितीमूल्यात्मक, सामाजिक, सांस्कृतिक बदल
अस्तित्वात येत नाहीत तोपर्यंत नवी स्त्री निर्माण होणे शक्य नाही.”(पूर्वोक्त पा. क्र.
552)
- मयूर अरुणा जयवंत